हिंगोली : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी बस वाहकांना दिलेल्या ईटीआय मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. नवीन मशीन दिल्या जात नसल्याने मशीनमधून न निघणाऱ्या तिकीटाचा नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाच्या बसमधील प्रवाशांना तिकीट देण्यासाठी पाच ते सात वर्षापूर्वी वाहकांना अत्याधुनिक ईटीआय मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे वाहकांचा वेळ वाचण्यास मदत झाली. मात्र यातील बहुतांश मशीन आता जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होणे, मशीनमधील तिकीटाचा रोल अडकणे, मशीन हँग होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेकवेळा तर एखादा थांबा येईपर्यंतही मशीन सुरू होत नाही. यातूनच प्रवाशांना तिकीट दिले नसल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारातून माहूर आगारात एका वाहकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. ईटीआय मशीनच्या बिघाडाचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातही घडत असून यामुळे वाहक वैतागले आहेत. यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्या. परंतु, किरकोळ दुरूस्ती करून मशीन पुन्हा सोपवली जात आहे. मशीन न स्विकारल्यास कारवाई केली जाईल, या भीतीने वाहकांना नाइलाजाने मशीन वापरावी लागत आहे.
दररोज ६ मशीन बिघडतात
जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी येथे आगार आहे. या तिनही आगारात दररोज एक ते दोन मशीनविषयी तक्रारींचा पाढा वाहक वाचतात. जिल्ह्यात किमान सहा मशीनमध्ये तरी बिघाड होत असल्याची माहिती वाहकांनी दिली.
वर्षभरात ४०० तक्रारी
१) ईटीआय मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने आगारामध्ये याविषयी तक्रार करण्यासाठी नोंद रजिस्टर ठेवण्यात आले होते. सुरवातीला या रजिस्टरमध्ये ईटीआय मशीनविषयी तक्रारीची नोंद घेतली जात होती. त्यानंतर मात्र रजिस्टरच ठेवले जात नसल्याचा आरोप काही वाहकांनी केला आहे.
२) जिल्हाभरातील प्रत्येक आगारात दररोज किमान एक ते दोन तक्रारी येत आहेत. वर्षभरात किमान ४०० तक्रारी तरी आल्या असतील. यातील काही तक्रारींची नोंद झाली तर काहीं वाहकांना रजिस्टरअभावी तक्रार करता आली नाही. त्यामुळे तक्रारीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) मशीन विषयी तक्रार केल्यास मशीन तात्पुरती दुरूस्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठी दुरूस्ती असल्यास मशीन कंपनीकडे पाठविली जात असल्याचे हिंगोली आगारातून सांगण्यात आले.
वाहक म्हणतात...
ईटीआय मशीनमधून अनेकवेळा तिकीट निघत नाही. बॅटऱ्या केवळ एक तासच चालत आहेत. अनेकवेळा तिकीट न निघताही तिकीट काढल्याची नोंद होत असल्याने अशा तिकीटाचे पैसे स्वत: भरावे लागत आहेत. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड बसत आहे. नवीन मशीन उपलब्ध करून द्याव्यात.
-टी.टी. बेंगाळ, वाहक
ईटीआय मशीन अनेकवेळा हँग होत आहे. मशीन हँग झाल्यास सुरू होण्यास अनेकवेळा दोन घंटे तरी वेळ लागत आहे. अशा वेळी लोकल थांबा जवळ असल्यास तिकीटही काढणे होत नाही. नवीन मशीन उपलब्ध करून द्याव्यात.
-जी.एस. घोरपडे, वाहक
हिंगोली आगाराकडे १४९ ईटीआय मशीन असून त्यापैकी दररोज किमान एक ते दोन मशीनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाहकांतून येत आहेत. किरकोळ दुरूस्ती असल्यास कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून मशीन दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो.
-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली
वाहकांना दिलेल्या ईटीआय मशीन अनेकवेळा हँग होत आहेत. मशीन ॲक्टीव्ह होण्यासाठी बंद करावी लागत आहे. अशा वेळी प्रवासी थांब्याच्या पुढे बस जाते. याचा फटका वाहकांना बसत आहे. बेस्टच्या धर्तीवर वाहकांना मशीन उपलब्ध करून द्याव्यात.
-एस.पी. काटकर, कार्यसमिती सदस्य, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, परभणी विभाग