हिंगोली शहरातील बहुतांश भागांमध्ये मोकाट गुरे रस्त्यावर बसल्याने त्याचा वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ही हिंगोलीकरांसाठीची कायमची डोकेदुखी आहे. या गुरांमुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडतात. पालिकेने या गुरांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्नही यापूर्वी केला. मात्र गुरांचे मालक एवढे निगरगट्ट आहेत की, त्यांनी गुरे सोडवून नेली नसल्याने त्यावर नाहक खर्च करीत बसण्याची वेळ आली होती. मात्र पालिकेला या गुरांचा लिलाव करण्याचेही प्रावधान आहे. जर मूळ मालक या गुरांकडे बघायलाच तयार नसतील तर त्यांनी अशा गुरांचा लिलाव करून पालिकेच्या तिजोरीत रक्कम टाकली पाहिजे.
हिंगोलीत कोंडवाडा नसल्यानेही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही गुरे पकडण्याची डोकेदुखी नको वाटते. शिवाय जेथे कोंडवाडा केला, त्या भागातच घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. तर शहरात दीडशे ते दोनशे मोकाट गुरे कायम फिरत असतात. शिवाय २० ते २५ गुरे विविध देवस्थानांना वाहिलेले असून त्यांना कोणी मालकच नसल्याने ते तसेही मोकाटच फिरतात. पालिकेला आता वाहतूक शाखेनेच पत्र दिल्याने या सर्व बाबींवर अंमलबजावणी होणार की कसे, याबाबत प्रश्नचिन्हच आहेत.