महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. एमपीएससी आयोगाने अचानक हा निर्णय घेतल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलल्या जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना ९ संधी असा भेद का? असे बाेलले जात आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.
परीक्षा वेळेत होत नाहीत
एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयोगाकडून वेळेच्या वेळी परीक्षा होत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे आयोगाच्या वतीने वेळेत जाहिराती काढून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्याकडून यावर्षी परीक्षा घेण्याचे आश्वासने दिली जातात ,पण ते वर्ष अजूनही आले नाही.
संदीप हराळ, हिंगोली
वेळेवर निकालही लागत नाहीत
एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा वेळेत होत नाहीत. तसेच त्यांचे निकालही वेळेवर लागत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यातच आयोगाच्या वतीने कमाल संधीचा निर्णय घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आकाश भगत, हिंगोली
या निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परीक्षेत भाग घेतल्यास एक पेपरला उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जात असल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त हाेत असल्याने हा निर्णय याेग्य वेळी घेणे गरजेचा हाेता.
कैलास बेंद्रे, हिंगोली
उमेदवारांना एकच न्याय द्यावा
एमपीएससी आयोगाने ६-९ संधीचे बंधन घालून दिल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या आदेशातील किचकट निर्णयामुळे अनेकांना संधी घालवावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येत असल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची गरज आहे.
प्रदीप कावरखे, गोरेगाव