लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मंगळवारी त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते केले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी जिल्ह्यातीलच नव्हे, तर देशातील अपघाताची स्थिती सांगितली. त्यातच अतिमहत्त्वाचे म्हणजे अपघाताला रस्ते कारणीभूत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच वाहने चालविताना वाहनाची गतीही कमी असणे तेवढेच गरजेचे आहे. जिल्ह्यात तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांचा आढावा घेतला असता दिवसाकाठी एक ते दोन व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी समोर आली. त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालविल्यास अपघाताच्या घटना टळण्यास मदत होऊन आपले मौल्यवान जीवन वाचण्यास मदत होऊ शकते, असे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सीईओ मुकीम देशमुख, सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, डॉ. गोपाल कदम, विभाग नियंत्रक जे. एन. सिरसाट, उपाधीक्षक राहुल मदने, सिद्धेश्वर भोरे, बी. आर. बंदखडके, अशोक जाधव, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती.
‘प्रत्येकास वाहतूक नियमांची माहिती हवी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:32 AM