वसमत : नगरपालिकेत लेखापाल म्हणून कार्यरत असताना मी सर्वांची देयके लिहिली. मुख्याधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची मर्जी सांभाळली. कामात कधी कुचराई केली नाही. एक वर्षापासून मात्र माझ्याच सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रस्तावाला खीळ घातल्या जात असल्याची भावना सेवानिवृत्त लेखापालाने व्यक्त केली. या प्रकरणासाठी २६ जानेवारीपासून उपोषणास बसणार असल्याने निवेदनही मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
वसमत न. प. चे सेवानिवृत्त लेखापाल यलप्पा राखेवार हे वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांचा सेवानिवृत्ती वेतनासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात टाळाटाळ होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अशोक साबळे व आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रस्ताव अडकवून टाकला असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास २६ जानेवारीपासून नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना यलप्पा राखेवार म्हणाले की, मी सेवा देतांना कामात कधी हयगय, कुचराई केली नाही. प्रत्येकाचा मान राखला. मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देताच देयके लिहिली. पण आता माझ्या सेवानिवृत्ती प्रकरणास खीळ घालण्याचा अजब प्रकार होत आहे. हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.