हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ८ मतदान केंद्रांवर गुरूवारी तपासून मशीन पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी ७ वाजता मतदान सुरू होताच काही वेळाने ३९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. मात्र, त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड दूर करण्यासह मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. यादरम्यान किनवट तालुक्यातील टाकळी तर हदगाव तालुक्यातील कोळी, वडगाव येथे ईव्हीएम, बॅलेट मशीन आणि कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी संपूर्ण संच बदलावा लागला. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे मतदान केंद्र क्रमांक ८२ वरील ईव्हीएम मशीन ऐनवेळी बंद पडली. कर्मचाऱ्यांनी यावेळी मशीन सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. परिणामी, दुसरी मशीन या ठिकाणी मागवून घ्यावी लागली. येथे सकाळी ७ वाजता सुरू होणारे मतदान ८:३० वाजता सुरू झाले.
तर वसमत शहरातील केंद्र क्रमांक २३८ वर मशीनमध्ये व्यत्यय आल्याने मतदान प्रक्रिया दहा ते पंधरा मिनिटे थांबली होती. तसेच वसमत तालुक्यातील आंबा येथेही मतदान प्रक्रियेदरम्यान मशिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. लोकसभा मतदार संघातील केंद्रावर ३९ मतदान केंद्रांवरील बॅलेट मशीन, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनिट आणि २५ ईव्हीपॅड मशीनमध्ये अडथळा निर्माण झाल्याने काही वेळ मतदान प्रक्रियेस व्यत्यय निर्माण झाला. परंतु, तांत्रिक बिघाड दूर करण्यासह तत्काळ मशीन बदलून देण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
दरम्यान, जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून, जिथे कुठे मशीनमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी तत्परतेने लक्ष देवून संबंधीत मशीन बदलून दिली जात आहे. लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.