ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.८ - शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे माजी खा. शिवाजी माने यांनी व्हाया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अखेर भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवाजी माने यांनी शिवसेनेतील अंतर्गत विरोधाला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे नंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघावरून त्यांचे राजीव सातव यांच्याशी वितुष्ट आले. तरीही मतभेद बाजूला सारून त्यांनी त्यावेळी सातव यांना साथ दिली. सातव विधानसभेत गेले. पुढच्यावेळी सातव यांनी लोकसभेसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे पक्षात मन रमत नव्हते. मागच्या जि.प.च्या निवडणुकीच्या तोंडावर माने यांनी राष्ट्रवादी जवळ केली. त्यानंतर राष्ट्रवादीतही मागील काही दिवसांपासून त्यांना फारसे विश्वासात घेतले जात नसल्याने ते अस्वस्थ होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली तरीही राष्ट्रवादीने त्याची फारसी दखल घेतली नाही. त्यामुळे माने यांनी अखेर जवळा बाजार येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्याचा जि.प.च्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे, हे लवकरच कळेल.