हिंगोली : वसमत शहरातील गणेशपेठ भागात राहणाऱ्या साळुंके कुटुंबातील सुनेला भावनिक फोन करून एका भामट्याने ३ लाख ११ हजार ९४० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (साळुंके) यांची सून स्मितल अतिष साळुंके (३८, रा. वसमत) यांचे पुणे येथे असलेले घर भाड्याने द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन जाहिरात केली होती. त्यासाठी रणदीपसिंग नावाच्या भामट्याने २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान घर भाड्याने घेण्यासाठी बोलणी केली. घरभाड्यापोटी अनामत रक्कम म्हणून ५२ हजार रुपये साळुंके यांना देण्याचे ठरले. यावेळी भामट्याने ‘मी आर्मीत आहे, माझ्या अकाउंटवरून रक्कम जात नाही.
आर्मीच्या अकाउंटसाठी सिक्युरिटी रिव्हर्स अकाउंटिंग पद्धत वापरली जाते,’ असे साळुंके यांना फोनवर सांगून ‘तुम्ही माझ्या अकाउंटवर रक्कम पाठवा. ती मी तुम्हाला अनामत रकमेसह परत करतो,’ असे सांगितले. त्याने मर्चंट ऑफिस अकाउंट नंबरवर साळुंके यांना टप्प्याटप्प्याने ३ लाख ११ हजार ९४० रुपये टाकण्यास प्रवृत्त करून ऑनलाइन फसवणूक केली.