हिंगोली: २०२० या वर्षात १४१ महिला तर ९४ पुरुष बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिमेद्वारे ९१ जणांचा शोध लावला. यात पुरुष ३९ तर ५२ महिलांचा समावेश आहे.
अतिराग, कुटुंबकलह, किरकोळ भांडण, संतुलन बिघडणे आदी कारणांमुळे जिल्ह्यातील २३५ जणांनी घर सोडले होते. यानंतर घर सोडून गेलेल्या पुरुष व महिलांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, कुठेही आपले आप्तजन सापडत नाहीत, हे पाहून अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले. नातेवाईकांचा अर्ज आल्यानंतर बेपत्ता झालेल्या पुरुष व महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच नातेवाईकांनाही पोलिसांनी धीर दिला होता. घर सोडून जाण्याचे कारण विचारले असता बहुतांश नातेवाईकांनी घरकुती कलह, संतुलन बिघडणे, घरात विनाकारण वाद करणे, कोणत्याही गोष्टीवरून वाद करत किरकोळ भांडण करत घर सोडल्याचे सांगितले. नातेवाईकांनी पोलिसांचे दार ठोठावल्यामुळे पोलिसांनी बेपत्ता पुरुष आणि महिलांचा शोध लावण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत ९१ जण सापडले. सापडलेल्या महिला व पुरुषांची समजूत काढून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. उर्वरित बेपत्ता १४४ महिला व पुरुषांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
घर सोडून जाण्याचे कारण
अतिराग, कुटुंबकलह, संतुलन बिघडणे, किरकोळ भांडणे आदी कारणे घर सोडून जाण्यास कारणीभूत आहेत. तसेच इतर कारणांमुळे काहींनी घर सोडले. नातेवाईकांचा अर्ज आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि ९१ जणांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. बेपत्ता झालेल्यांमध्ये १४१ महिला तर ९४ पुरुषांचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी उदय खंडेराय यांनी सांगितले.