हिंगोली : पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार ११ सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी त्या त्या पोलीस ठाण्यात दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
औंढा तालुक्यातील पवार तांडा येथे एकाकडून २ हजार रुपये किमतीची हातभट्टीची गावठी दारू व २ हजार ५०० रूपये किमतीचे गूळमिश्रीत रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई ११ सप्टेंबरला साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर भिसे यांच्या फिर्यादीवरून यशवंत हरिसिंग पवार (रा. पवार तांडा) याचेविरूद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंद झाला. यशवंत पवार याच्याकडे पोलिसांना हातभट्टीची दारू व गूळमिश्रीत रसायन आढळून आले. तपास पोलीस नाईक सिद्दीकी करत आहेत.
सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव फाटा येथेही मंगेश भास्कर गवळी (रा. सेनगाव) याच्याकडून पोलिसांनी देशी दारूच्या ७०० रूपये किमतीच्या १० बॉटल जप्त केल्या. ही कारवाई ११ सप्टेंबरला पाच वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी पोलीस हवालदार शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथील सिरसम रोडवरील लिंबाच्या झाडाखाली रमेश सोपान जाधव (रा. माळहिवरा) यांच्याकडून पोलिसांनी ६६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ११ बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार यांच्या फिर्यादीवरून रमेश सोपान जाधव याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक डुकरे करत आहेत. हिंगोली तालुक्यातील पेडगाववाडी येथे बासंबा पोलिसांनी एकाकडून १ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन गोरले यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ नारायणनाथ धायडे (रा. पेडगाववाडी) याचेविरूद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील नवखा ते लाख जाणाऱ्या रोडवरील एका झोपड्यावर एकाकडून १३०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या १३ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई बंडू राठोड यांच्या फिर्यादीवरून सदाशिव शिवराम खोरणे (रा. नवखा ता. हिंगोली) याचेविरूद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक एस.पी. शेळके करीत आहेत. सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दत्ता संपत इंगोले व गजानन माधव माहुरकर (रा. कडोळी) याच्याकडून देशी दारूच्या १३२० रूपये किमतीच्या २२ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघांनी दारूच्या बॉटल जागेवरच सोडून पळ काढला. याप्रकरणी गोरगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी मारोती नंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक मैदकर करीत आहेत तसेच मन्नासपिंप्री येथे नामदेव पांडुरंग सुतार याच्याकडून १८०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या ३० बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस कर्मचारी काशीनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.