लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील सुविधा, सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण देणे यासह विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कामे केली जातात. २०१७-१८ या वर्षात सर्व शिक्षाला विविध उपक्रम व योजनेच्या कामावर ८ कोटी ९० लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत.६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम राबविला जात आहे. सदर योजना प्रभावीपणे राबविणे व जि. प. प्राथमिक शाळांचा विकास हे ध्येय समोर ठेवून बालकांना शिक्षण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या अभियान अंतर्गत प्रयत्न केले जात आहेत. शाळांचे बांधकाम, नवीन वर्गखोल्या तसेच मोफतपाठ्य पुस्तक वाटप करणे यासह विविध योजनांसाठी सर्व शिक्षा अभियानला शासनाकडून खर्च दिला जातो. ३० मार्च २०१८ अखेर योजने अंतर्गत १० कोटी ३५ लाख १९ हजार रूपये निधी खर्च करण्यासाठी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ८ कोटी ९० लाख ६५ हजार रूपये खर्च करण्यात आला. यामध्ये शालेय गणवेश वाटपसाठी २९९.१७ खर्च झाला. तर शिक्षक प्रशिक्षणावर ३१.१७, गटसाधन केंद्र अनुदान १६०., समुह साधन केंद्र अनुदान १४.९६, अपंग समावेशित शिक्षण ७६.४०, बांधकाम ६१.८८ तसेच शाळा अनुदान ६५.०७ यासह विविध योजनांवर खर्च करण्यात आला.जेथे शाळा नाहीत, त्या ठिकाणच्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे, तसेच शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा आणण्यासाठी यासह विविध योजनांची अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षा अभियान राबविले जाते.
सर्व शिक्षा योजनेत ८९०.६५ खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:01 AM