हिंगोली : गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने आणलेल्या विदेशी मद्याद्वारे बनावट मद्य तयार करून विक्री करणारा कारखाना पिंपळदरी शिवारात उघडकीस आला. कळमनुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्याप्रमाणात बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळदरी शिवारात शेख बुऱ्हाण शेख कासीम यांच्या शेतातील घरात गोवा राज्यातून आणलेल्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. आरोपी या द्वारे बनावट विदेशी मद्य तयार कार्यन विक्री करत. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी बुधवारी (दि. २५) शिवारात धाड टाकली. यावेळी शेख बुऱ्हाण तेथे आढळून आला. अधिक चौकशीत हा कारखाना विवेक उर्फ सावकार विश्वनाथ पोंपटवार ( रा. आ.बाळापूर) व गजानन दादाराव रिठ्ठे ( रा. पिंपळदरी ) हे चालवत असल्याची माहिती मिळाली. यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, संभाजी लेकुळे, आशिष उंबरकर, राजूसिंग ठाकुर आदींनी केली.