ऑनलाईन लोकमत
हिंगोली, दि. १४ : आखाडा बाळापूर येथे ५० लाखाच्या ख-या नोटा घेऊन दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी) पथकाने पर्दाफाश केला. यात बनावट नोटा म्हणून मुलांच्या खेळण्यातील नोटा देवून फसवणूक करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडील गाडी व खेळण्यातील नोटा जप्त करुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ व उमरखेड येथून एकाने हिंगोली येथील विजय राज काळे (पाटील रा. गवळीपुरा) यांना फोन करुन पन्नास लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले. या प्रकरणी काळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत अर्ज करुन याबाबतची माहिती दिली होती. बनावट नोटा चलनात आणणारी एखादी टोळी सक्रीय असावी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जदार काळे यांना विश्वासात घेऊन सापळा रचला. १३ आॅगस्ट रोजी वारंगा फाटा ते हदगाव रोडवर पैशाची देवाणघेवाण करण्याचे ठरवून सापळा रचण्यात आला. एस.सी.बी.चे पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे व त्यांच्या पथकाने सापळा रचला.
सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास कार व मोटारसायकलने आरोपी तेथे आले. बनावट नोटांची बंडल असलेली काळी बॅग अर्जदाराला दाखवून ख-या नोटांची मागणी करत असतानांच साध्या वेशातील पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील काळ्या बागेतील नोटांची बंडल लहान मुलांच्या खेळणीतील बच्चो की बँक च्या नोटांचे होते. पण त्या बंडलावर खाली आणि वर एकेक ख-या नोटा जोडल्या होत्या. २००० व ५०० रुपयाचे बंडल असलेली बॅग इंडिका कार, मोटारसायकल, मोबाईल व बनावट नोटा असा एकूण ४, ८०, ७०० रुपये माल जप्त केला.
या प्रकरणी एल. सी. बी. फौजदार विनायक लंबे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अफरोज खॉ जमीरखॉ पठाण (मेमन कॉलनी, यवतमाळ), शेरखाँन मुनवरखॉन ( रा. जामा मस्जिद वार्ड, उमरखेड ) शेख समीर शेख इलियास (रा. मुर्तुजानगर, उमरखेड) शेख रहेमान शेख इस्माईल (रा. काजीपुरा, उमरखेड), महोमद सदब शेख महेबुब (रा. देविदास नगर, बालाजी मंदीर जवळ यवतमाळ) यांच्या विरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार विनायक लंबे हे करीत आहेत.