औंढा नागनाथ : /आरोग्य /सेवा सत्रांचा निश्चित दिवस काम करण्याच्या अहवालामध्ये एक वर्षांपूर्वी मयत व बदली झालेल्या आरोग्य सहाय्यकांना सध्या सेवा सत्रामध्ये कार्यरत दाखविले आहे. ही बाब जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली असून, यावरून वैद्यकीय अधिकार्यांचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवेचे सत्र ग्रामीण भागामध्ये करण्यासाठी तसेच रूग्णांना प्राथमिक सेवा व उपचार गावांमध्येच उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातील चार आठवड्याचा दैनंदिन आरोग्य सेवेचा कार्यक्रम निश्चित करून तसा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडे पाठविण्यात येतो. जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचा अहवाल पाठविला असून, त्यामध्ये आरोग्य सहाय्यिका के.एन. चव्हाण यांचे नाव आहे. परंतु त्यांचे एक वर्षापूर्वीच परभणी येथे रेल्वे अपघातामध्ये निधन झाले. त्याच प्रमाणे आरोग्य सेवक बी.आर.पारडकर हे हिंगोली येथील जिल्हा आरोग्य कार्यालयात कामकाज करतात; परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी. केंद्रे यांनी तालुका आरोग्य कार्यालयात दिलेल्या आरोग्य सत्राचा अहवालात या तिन्ही आरोग्य सेवकांना मासिक आरोग्यसेवांचे वाटप केल्याच नमूद आहे. यानुसार २९ गावांमध्ये दिल्या जाणार्या प्राथमिक आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी केंद्रे यांनी चुकीचा अहवाल पाठवून शासनाची दिशाभूल केली असल्याचे निदर्शनास येत आहे. /(वार्ताहर)