हिंगोली : तालुक्यातील सवड येथील शेतकरी खून प्रकरणातील चौघांवर मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सीताराम राऊत आणि रंगनाथ मोडे यांचे शेतीच्या वादाचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. याच कारणावरून त्यंच्यात अनेकदा वाद होत. यातूनच मोडे यांनी राऊत व त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली होती. सध्या पेरण्यांचे दिवस असल्याने हा वाद विकोपाला गेला आणि मोडे याने राऊत यांचा बुधवारी भर दुपारी खून केला.
खून करून आरोपी रंगनाथ मोडे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. तर या प्रकरणातील इतर तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. मयताची पत्नी मणकर्णा राऊत यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज मुख्य आरोपी रंगनाथ मोडे, मोतीराम राऊत, गणेश राऊत, तुळशीराम मोडे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोउपनि ज्ञानोबा मुलगीर करत आहेत.