औंढा नागनाथ (हिंगोली ) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तालुक्यातील नागेश वाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटी दरम्यान ते बोलत होते.
नागेशवाडी येथील शिवाजी कऱ्हाळे या शेतकऱ्यांने नापिकी व कर्ज बाजारी पणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटुंबियांचे आज सकाळी ९ वाजता विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटून सांत्वन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असून याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी, शेतमालाला भाव नाही, कर्जामाफीसाठी जाचक अटी अशा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत असा आरोपही विखे यांनी यावेळी केला.
यावेळी खासदार राजीव सातव, आमदार डॉ संतोष टारफे, जिल्हा कृषी अधिकारी लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, रमेश जाधव, बाबा नाईक, केशव नाईक, मारोती कऱ्हाळे, सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे,बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदींची उपस्थिती होती.