हिंगोली : अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे बैल घेणे महागाईच्या काळात परवडत नव्हते; मात्र खरिपाचा हंगाम जाईल या भीतीमुळे एका शेतकऱ्याने चक्क मुलांनाच औताला जुंपले आहे.
औंढा तालुक्यातील चोंडी (शहापूर) येथील शेतकरी हिरामन निवृत्ती कठाळे यांना पाच एकर शेती आहे. नगदी पीक म्हणून हळदीच्या पिकाकडे पाहिले जाते. यंदा पावसानेही चांगली हजेरी दिली. त्यामुळे बैल रोजंदारीने मिळणे कठीण झाले. मिळाले तरी हजार रुपये रोजंदारी अथवा भाडे मोजावे लागतात. दुसरीकडे भाडेे देण्यासारखी निवृत्ती कठाळे यांची आर्थिक परिस्थिती नाही आणि ते बैलही विकत घेऊ शकत नाहीत. गतवर्षी बैल भाडेतत्त्वावर आणले होते; मात्र गतवर्षी अतिवृष्टीने खरिपातील मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. बैल मिळत नसल्यामुळे या वर्षीचा हंगाम हातचा जाऊ नये म्हणून त्यांनी दोन्ही मुलांशी चर्चा केली. दोन्ही मुलांनी होकार देताच त्यांच्या खांद्यावर जू ठेवून शेतात हळद लागवडीसाठी कोळप्याच्या साह्याने सरी पाहण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी रोजमजुरीने बैल घेऊन करतो शेतीपोटाला अन्न मिळेल एवढी शेती आहे. अल्पभूधारक असल्यामुळे लाखापेक्षा जास्त रक्कम मोजून बैलजोडी खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यात महागाईने कळस गाठला आहे. भाडेतत्त्वावरही बैल घेणे परवडत नाही. खरीप हंगाम हातचा जाईल म्हणून नांगरणी करण्याचे ठरविले. मुलांना विचारले तर बैल भाड्याने अथवा रोजंदारीने घेणे आपल्याला परवडत नाही. तुम्ही साथ दिली तर आपल्याला हळद लावता येईल. मुलांनीही आज्ञा पाळत होकार दिला. चक्क औताचे जू खांद्यावर घेऊन १६ जूनपासून हळद लागवडीचे काम हाती घेतले आहे.-हिरामन कठाळे, शेतकरी