वसमत : तालुक्यातील बाभूळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी महिला द्रोपदाबाई उर्फ ध्रुपतीबाई मगर (४०) या महिलेने सततच्या नापिकीला व मुलीच्या शिक्षणासह भविष्यातील लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाच्या विवंचनेतून मंगळवारी ( दि. १८ ) सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बाभूळगाव माहेर असलेल्या द्रोपदाबाई या एका पायाने अपंग होत्या. त्यांचा विवाह गावातीलच गोपीनाथ मगर यांच्याशी झाल्याने तेच सासरही आहे. अवघी साडेतीन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पती गोपीनाथ फारसे काम करीत नाहीत. त्यांना एक मुलगा सचिन (वय १९ वर्षे) असून तोही मजुरीच करतो. मुलगी विद्या हिने दहावीत ९० टक्के गुण मिळविले असून सध्या ती बारावी विज्ञान शिक्षण घेण्यासहीत वैद्यकीय परीक्षेची तयारी करीत आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे यासह विद्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा केवळ कोरडवाहू शेती आणि सचिनची मजुरी यातूनच करावा लागतो. परंतु मागील तीन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न प्रचंड घटले असून कोरडवाहू शेती असल्याने सोयाबीन व ज्वारीशिवाय इतर कोणतेच पीक घेता येत नाही. मुलगी अभ्यासात हुशार असून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न असल्याने तिच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च लागत होता. यानंतर तिच्या लग्नासाठी खूप खर्च येणार याची चिंता होती. त्यामुळे शिक्षणासह कुटुंबाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी महिलेने स्वत:च्या घरातच सकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यापूर्वी दोन शेतकरी महिलांची आत्महत्यायापूर्वी २0१८ मध्ये २ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे. हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील कलावतीबाई पांडुरंग काळबांडे यांनी २३ फेब्रुवारीला विहिरीत उडी घेतली होती. तर याच तालुक्यातील केसापूरच्या राधाबाई किसन खंदारे यांनी ३0 मार्चला विहिरीत उडी घेतली होती. या दोघींनाही शासकीय मदत मिळाली होती.