कमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शेतातून घराकडे परतत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने अपघातामध्ये एका ४५ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालकाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.यातील मयत कैलास हरिभाऊ मोरे (४५)हे ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीसह शेतातून घराकडे पायी जात होते. तितक्यात पाठीमागून आलेल्या एमएच- ३८ ए- ९२०७ क्रमांकाच्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात कैलास मोरे यांना गंभीर दुखापत झाली. सदर घटना गोरेगाव-पळशी रस्त्यावर घडली. अपघातानंतर जखमी होऊन मोरे बेशूद्ध पडले. सोबत असलेल्या मोरे यांच्या पत्नीने आरडा ओरडा करीत मदतीसाठी हाका मारीत वाटसरू ग्रामस्थांच्या मदतीने कैलास मोरे यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सदर प्रकरणी मयताच्या पत्नी उषा कैलास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालक सुरेश निवृत्ती कावरखे यांच्या विरूद्ध भरधाव वेगात निष्काळजीपणे दुचाकी चालवित धडक देवून मरणास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास बीट जमादार भूमीराज कुमरेकर करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, भाउ, पत्नी, दोन मुल व एक मुलगी असा परिवार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे शवविच्छेदनासाठी तब्बल १८ तास मृतदेह ठेवलेला होता. गोरेगाव येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा तुटवडा आहे.
दुचाकीच्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:49 PM