पाण्याचे स्त्रोत आटू लागले
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहे. अनेक गावातील विहीर व बोअरांची पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे काही गावकऱ्यांना पाण्यासाठी इतरत्र ठिकाणी फिरावे लागत आहे. चार दिवसांपासून ऊनही पडत असून उन्हाळ्याची स्थिती गावात निर्माण झाली आहे.
वाळू मिळत नसल्याने घरकुलधारक त्रस्त
औंढा नागनाथ : सध्या अनेक घरकुलधारकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले आहे. पण घराचे बांधकाम करताना वाळू मिळत नसल्याने अनेकांना आपले घराचे बांधकाम अर्धवट सोडावे लागत आहे. यासाठी वाळू घाटांचा लिलाव लवकरात लवकर करुन बांधकामासाठी वाळूसाठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी घरकुलधारकांतून होत आहे.
येहळेगाव - निशाणा रस्त्याची मागणी
औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. - निशाणा रस्ता जागोजागी उखडला आहे. यामुळे रस्त्यांवरुन ये - जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावरील गिट्टी उखळून आल्याने या रस्त्यावरुन वाहने घसरत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात घाण कचरा
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील बसस्थानक परिसरात कचऱ्याचा ढिगारा जमा झाला असल्याने याठिकाणी दिवसेंदिवस घाण निर्माण होत आहे. तसेच या कचऱ्यातून दुर्गंध निघत असल्याने याचा त्रास बसस्थानकातील प्रवाशांना होत आहे. यासाठी बसस्थानक परिरसरातील घाण साफ करण्याची मागणी होत आहे.
गावात सिमेंट रस्त्याची मागणी
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात एकही रस्ता सिमेंटचा नाही. पूर्ण गावात मुरूमाचे रस्ते असून या रस्त्याच्या मधोमध मोठाले खड्डे पडले आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास होत आहे. सध्या अनेक गावात सिमेंट रस्त्याचे काम होत असून साखरा गावातही सिमेंट रस्ता व्हावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.