हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या घरासमोर उपोषण सुरु केले. या आधी या शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर दोन दिवस उपोषण केले.
गारखेडा येथील राजू खिल्लारे हे शेतात विद्युत जोडणी करण्यासाठी तीन वर्षांपासून महावितरणचे उंबरठे झिजवत आहेत. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून गारखेडा येथे दलित समाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लगात आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत जोडणी करुन दिली तरीही जोडणी काही वेळात तोडली जात आहे. ती जोडणी कायमस्वरुपी करण्यासाठी संबंधित गावातील शेतकरी अनेकदा खेटे घेत आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. परिणामी, हे उपोषण करावे लागत असल्याचे शेतकरी खिल्लारी यांनी सांगितले. यानुसार त्यांनी या आधी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर दोन दिवस उपोषण केले. त्यानंतर आज त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर उपोषण सुरु केले आहे. यावरही विद्युत जोडणी मिळाली नाही तर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषण करणार असल्याची माहिती खिल्लारे यांनी दिली.
काय अडचण आहे ?संबंधित शेतकऱ्यांची लाईन जोडून दिली की, काही वेळात ती तोडली जाते. त्यामुळे आता तो विद्युत पुरवठा पोलीस संरक्षणात जोडून देण्यात येणार आहे. तसे पत्रही पाठविले असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.