हिंगोली : सुटे पैसे देतो असे म्हणून एका शेतक-यास चाळीस हजारांनी गंडविल्याची घटना हिंगोली शहरातील एसबीआय बँक परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच हतबल झालेल्या शेतक-याने हंबरडा फोडला.
हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील शेतकरी काशिराम लिंबाजी घोंगडे २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास हिंगोली शहरातील एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून ५८ हजार रूपये त्यांनी काढून घेतले. बँकेच्या बाहेर पडताच त्यांना एका अनोळखी इसमाने चहा पिण्यास हॉटेलवर नेले. हा इसम ओळखीचा असावा असे काशिराम यांना वाटले. चहा घेतल्यानंतर त्या इसमाने तुमच्या कडील रक्कमेची सूट्टे देतो असे म्हणत काशिराम यांच्याकडील नोटा घेतल्या. नोटांची अदलाबदल करत त्याने ५० रूपयांच्या ख-या नोटा घेऊन त्यांना दोन हजारांच्या बनावट नोटा दिल्या व तो इसम लगेच तेथून पसार झाला.
हुबेहुब ख-या नोटांसाख्याच दोन हजारांच्या बनावटा नोटा असल्याने काशिराम यांनाही काही समजले नाही. मात्र, काही वेळाने त्यांना आपल्याकडील ५८ हजार रूपयांच्या रोकडमध्ये केवळ १८ हजार रूपयेच खरे असल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकरी काशिराम घोंगडे व रंगनाथ पाटील यांनी ठाण्याकडे धाव घेतली व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी सुनील अंभोरे, सुधीर ढेंबरे यांचे पथक तत्काळ रवाना झाले.