हिंगोली : मागील काही दिवसांपासून मोंढ्यातील व्यवहार ठप्प असल्याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. २० जून रोजी हळदीचे मार्केट सुरू होणार असले तरीही १९ रोजी सकाळीच वाहनांच्या दोन किमीच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
मागील काही दिवसांपासून मोंढा विविध कारणांनी वारंवार बंद राहात आहे. त्यामुळे यंदा हळदीच्या खरेदीचे दिवस त्या तुलनेत कमी राहिले. यंदा विविध भागात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. शिवाय विदर्भातूनही हिंगोलीच्या मोंढ्यात मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. त्यामुळे स्थानिक व बाहेरची अशी दहा ते बारा हजार क्विंटल हळद मोंढ्यात बिटाच्या दिवशी येते. आता खरिपाच्या तोंडावर तर ही आवक वाढत असल्याचे दिसत आहे.
यंदा हळद काढणीच्या हंगामातच अवकाळी पाऊस व गारपीट झाली. वारंवार पडणाऱ्या पावसामुळे हळद काढणीला विलंब झाला. त्यामुळे यंदा नवीन हळद मार्केटला येण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका व इतर कारणांनी मोंढ्यातील व्यवहार बंद राहिले. परिणामी, आता खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणल्याचे दिसत आहे.
दुसरा मुक्काम टाळण्यासाठी मुक्कामीदुसऱ्या दिवशी मुक्काम करण्याची वेळ येवू नये म्हणून शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीच मुक्काम करून वाहनांच्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. या रांगा पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते.
रस्त्यावरच जेवण व आरामया वाहनांना बाजार समितीच्या आवारात आताच प्रवेश दिला जाणार नसल्याने दिवसभर त्यांना रस्त्यातच वाहने ठेवावी लागली. शिवाय तेथेच त्यांनी जेवण उरकले. तर जेवणानंतर तेथेच आराम करून गप्पांचा फड रंगवल्याचे दिसत होते. आठ ते दहा हजार क्विंटल हळदीची आवक या ठिकाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.