लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव (जि. हिंगोली) : नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे पीककर्ज फेडायचे तरी कसे या विवंचनेतून हताश झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी स्वत:लाच श्रद्धांजली वाहत अवयव विक्री करण्यासाठी संध्याकाळी मुंबईकडे रवाना होण्याचा निश्चय केला. शनिवारी मुंबईत दाखल होऊन कर्ज परतफेडीसाठी शासनाला शरीरातील अवयव काढून देणार आहोत. तेव्हा गावाकडे जिवंत परत येऊ की नाही, हा प्रश्नच आहे, असे या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
खरीप हंगामात पिके करपून गेली. उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाहीत. शेतकऱ्यांनी पीकविमा व इतर शासकीय अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु, शासनाने अजिबात लक्षही दिले नाही. त्यामुळे आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा’, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.