गोरेगाव (जि. हिंगोली) : अतिवृष्टी नुकसानभरपाई मदत व पिकविमा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १६ सप्टेबर रोजी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत परिसरातील शेतकऱ्यांकडून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह तीन महसूल मंडळ अतिवृष्टीतून वगळली गेली आहेत. असे असताना शेतकरी तसेच विविध संघटनांकडून निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करीत सरसकट अतिवृष्टी अनुदान देण्याची मागणी केली आहे. गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर १६ सप्टेंबर रोजी सकाळी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो व इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून देत अतीवृष्टीतून डावल्यप्रकरणी निषेध व्यक्त केला. तसेच अतिवृष्टी अनुदान व पिकविमा सरसकट मंजूर करावा, शासनाकडून घोषित केल्यानुसार नियमित पीककर्ज हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. कोरोना काळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. तसेच शेती विद्युत बिल वसुली थांबवत शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
सदर संपामध्ये नामदेव पतंगे, गजानन कावरखे, कडूजी तायडे, गजानन सावके, शामराव रणबावळे, अनिल खोडे, बालाजी राऊत, विठ्ठल काळे, विठ्ठल सावके, महेपत मुधळकर आदींसह गोरेगाव बाभुळगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तर तालुका वंचित बहुजन आघाडीकडून सदर शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.