हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनावर धडक मारल्यानंतर तेथे या शेतकऱ्यांना पोलिसांनी १९ रोजी दुपारी १२ च्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रणही मिळाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून सरकारशी लढा सुरू आहे. सततची नापिकी, पिकांवरील रोगराईमुळे शेतीचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे पीककर्ज फेडायचे तर आमचे अवयव विकत घ्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. २२ नोव्हेंबरला पहिल्यांदा किडनी, डोळे, लिव्हर विक्री करायचे असल्याचे निवेदन दिले होते. गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींचा यात समावेश आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न मुंबईत जावून केला. मात्र त्यावेळीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा गोरेगाव येथे येवून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. या शेतकऱ्यांचा प्रश्न अनेकांनी विधिमंडळातही मांडला.
१९ डिसेंबर रोजी हे शेतकरी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर धडकले. त्यांच्यासमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व इतर शेतकरीही होते. शांततेच्या मार्गाने गळ्यात किडनी, लिव्हर व डोळ्यांचे दर लटकवलेले फलक घेवून ही मंडळी विधान भवनाकडे जात होते. ५०० मीटर अंतरावर असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या ही मंडळी पोलिसांच्या ताब्यात आहे. बळजबरीने त्यांना गाडीत कोंबून नेले. आता सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आल्याचे सांगण्यात आले.
...तर संसदेसमोर आंदोलनशेतकऱ्यांना सततच्या नापिकीमुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. सरकारसोबत चर्चेत हाच प्रमुख मुद्दा राहणार आहे. जर राज्य सरकारकडे तोडगा निघाला नाही तर आता दिल्लीत संसद भवनासमोर अवयव विक्रीसाठी जाणार असल्याचे नामदेव पतंगे यांनी सांगितले.