हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तु. परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले असून, वनविभागाकडून वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये तारकुंपन करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी विभागीय वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील घोडा, जरोडा, तुप्पा, नवखा, नरवाडी, बेलमंडळ, बाभळी, कामठा, येहळेगाव तु. झरा, बिबगव्हाण आदी गावांची शेतजमीन वनपरिक्षेत्राच्या लगत आहे. सध्या या भागातील पिके चांगली बहरली आहेत. दोन वर्षांच्या नुकसानीनंतर यावर्षी पिकांतून चांगले उत्पन्न हाती येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रोही, रानडुक्कर, वानर आदी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. जवळच वनपरिक्षेत्राची जमीन असल्याने शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना हुसकावून लावले तरी परत पिकांची नासाडी करीत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व वनपरिक्षेत्रालगतच्या हद्दीमध्ये तार कुंपन करावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर योगेश मित्रदेव पाटील, गौरव प्रतापराव देशमुख यांच्यासह घोडा, जरोडा, तुप्पा, नवखा, नरवाडी, बेलमंडळ, बाभळी, कामठा, येहळेगाव, झरा, बिबगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो :