सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील हत्ता येथे मागील काही दिवसांपासून विज पुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे आज शेतकऱ्यांनी सेनगाव -जिंतूर मार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यातील हत्ता उपकेंद्रात गावात विजेची समस्या गंभीर बनली आहे. शेती साठी सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.या उपकेंद्रात विज रोहित्राचे नवीन कामे परस्पर खाजगी कंत्राटदारानी केले असून त्याचा परिमाण म्हणून कमी दाबाचा विज पुरवठा होत आहे. हत्ता येथे तांत्रिक बिघाडामुळे सातत्याने विज पुरवठा खंडित होत आहे. यावर महावितरणाचे अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाहीत. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सेनगाव - जिंतूर रोडवर आज सकाळी रास्तारोको केला. आंदोलनात हत्ता, ब्रम्हवाडी, बोडखा, तांदुळवाडी, चिखलागर, गणेशपुर, उटी, भंडारी, लिंबाळा सह परिसरातील गावातील शेतकरी सहभागी होते. आंदोलनाने राज्य रस्त्यावरील वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती.
यानंतर सहाय्यक अभियंता रामजीरवार, कनिष्ठ अभियंता नितीन लगडेवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून पंधरा दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रविंद्र गडदे, निराधार योजना समिती अध्यक्ष पुरुषोत्तम गडदे, सरपंच हरीभाऊ गादेकर, गणेश राठोड,बाळासाहेब गडदे,पंडित गडदे,दिपक डवळे, प्रेमचंद आडे,गजानन थिटे,शेख हकिम,सुभाष गडदे आदींचा सहभाग होता.