हिंगोली : सततच्या नापिकीमुळे पीककर्ज भरण्याची ऐपत नसल्याने अवयव विक्रीसाठी मुंबईत गेलेल्या शेतकऱ्यांना आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी पाचारण केले. त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेना आपल्या पाठीशी आहे. असे कोणतेही पाऊल उचलू नका, असे आवाहन केले.
हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, संतोष वैद्य, गजानन जाधव, दीपक कावरखे, विजय कावरखे, धिरज मापारी यांचा यात समावेश आहे. तीन ते चार दिवस त्यांची कोणीच दखल घेतली नाही. शेवटी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ३० नोव्हेंबरला मातोश्रीवर गेले होते. तेथे खा.विनायक राऊत यांना भेटले. तेथून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आझाद मैदान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
१ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अवयव विक्रीसारखे कोणतेही पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाच्या विरोधात शिवसेना आंदोलन उभे करील, अशी ग्वाही दिली.
हिंगोलीत आंदोलन करणारहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रबी हंगामातील नुकसानीसाठी भरपाई मिळावी, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची भरपाई मिळावी यासाठी हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना सांगितले.