- के.के. ठाकूर (पानकनेरगाव)
मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. तालुक्यातील पानकनेरगाव येथील शेतकरी संतोष शिंदे यांनी ‘आॅफ सिजन’मध्ये दोन एकर क्षेत्रात खरबुजाची शेती फुलवली आहे.
शिंदे यांनी २ एकर शेतात ११ हजार पाचशे खरबुजांच्या रोपांची चार बाय दीड फूट अंतरावर मल्चिंग पेपर व ठिबकवर लागवड केली. खरबुजाचे पीक ७० दिवसांत येते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन असेल. उत्पन्नही चांगले मिळते. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ठिबक व मल्चिंगमुळे कमी पाण्यात खरबुजाची शेती फुलवली आहे. खरबुजाचे पीक कमी पाण्यात आणि कमी दिवसांत येत असल्याने या पिकाची निवड केल्याचे शिंदे यांनी सांगितले. निर्यातक्षम खरबूज उत्पादनासाठी त्यांनी प्रतिवेलावर ५ फळे ठेवून बाकीची फळे तोडून टाकली. काटेकोर नियोजन आणि संगोपन हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. मातीपरीक्षणातून खत व पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवले.
मल्चिंग आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन न होता योग्य वापर झाला. पिकांना आवश्यक असलेली सूक्ष्म पोषकद्रव्ये, पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून सोडली. लागवडीपासून फळ काढणीस येण्याचा कालावधी ७० दिवसांचा असतो. १५ नोव्हेंबरपर्यंत खरबूज तोडणीस येणार आहे. ५५ टन उत्पन्नाची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ‘आॅफ सिजन’ पीक घेतल्याने किमान २० रुपये किलोचा दर मिळाल्यास १५ ते २० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनबद्ध पीक पद्धतीमुळे त्यांना शेतीतून चांगला नफा मिळत गेला.
आज संपूर्ण १८ एकर शेती वहितीखाली आहे. त्यामध्ये ३० गुंठे जमिनीत त्यांनी शेडनेट उभारले असून, यावर्षी एक एकर शेडनेट मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. शेडनेटमध्ये भाजीपाला व फळझाडांच्या रोपांची त्यांची नर्सरी आहे. नर्सरीमधून वर्षाकाठी १५ ते २० लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नर्सरीत भाजीपाल्याच्या रोपामध्ये ते मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी, शेवगा, झेंडू, खरबूज, कलिंगड, सिमला या भाजीपाला पिकांची रोपे, तर फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, जांभूळ, पपई, जांब, केळी, संत्रा या फळझाडांची रोपे ते तयार करतात.
दरवर्षी ते वेगवेगळ्या वाणांची निवड करून ‘आॅफ सिजन’ पीक घेतात. त्याचा फायदा हा की, बाजारात स्पर्धक कमी मिळून दर अधिक मिळतो. दोडका, सिमला, कलिंगड, पपई, शेवगा अशा वेगवेगळ्या पिकांची ते दरवर्षी निवड करतात. विशेष म्हणजे १९९४ ते २००१ पर्यंत, ही आठ वर्षे शिंदे यांनी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केले. त्यांना वडिलोपार्जित एकूण १८ एकर शेती आहे.