कनेरगाव नाका: कनेरगाव नाका व परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे विहीर व तलावांना भरपूर प्रमाणात पाणी आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात घेतला. सध्या रबी हंगामातील पिके चांगली आहेत. परंतु, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
सद्य:स्थितीत रबी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली आहे. परंतु, गत काही दिवसांपासून वन्य प्राणी शेतात उगवलेल्या पिकांची नासाडी करीत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आधीच शेतकरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची आशा आहे. पिकांबरोबरच पालेभाज्यांची नासाडीही वन्यप्राणी करीत आहेत. वन विभागाला वेळोवेळी सांगूनही वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करीत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. वन विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.