- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे मराठा समाजाला आरक्षण व जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने ७ सप्टेंबरपासून स्मशानभूमीत उपोषण सुरू केले आहे. कुरुंदा येथील सात जण उपोषणाला बसले आहेत. वाजतगाजत मोर्चा काढून स्मशानभूमी येथे जाऊन उपोषणाला सुरुवात केली आहे.
मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कुरुंदा येथील स्मशानभूमीत उपोषण करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. प्रशासनाला निवेदन देण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यानंतर वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
उपोषणाला ग्रामस्थांनी दिला पाठिंबा...
७ सप्टेंबर रोजी दुर्गामाता मंदिरापासून वाजतगाजत मोर्चा काढत स्मशानभूमीत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पर्वतराव दळवी, सतीश दळवी, गजानन इंगोले, चक्रधर दळवी, बबनराव दळवी, मारोती मुळे, गोविंद दळवी आदी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाला पहिल्या दिवशी फौजदार युवराज गवळी, मंडळधिकारी आनंद शिंदे, तलाठी उजाळे आदींनी भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.