लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड यांना मारहाण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करावा तसेच शेगाव खोडके येथील ग्रामस्थांवर दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले आहे.सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड यास तेलंगणा पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेऊन वाहनात कोंबले होते. परंतु हे लोक अपहरणकर्ते आहेत, असे समजून तेलंगणा येथील पोलिसांना ग्रामस्थांनी डांबून ठेवले. या प्रकारामुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण निवळल्यानंतर मात्र याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गणेश सीताराम गायकवाड व त्यांच्या पत्नी उर्मिला गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. तेलंगणा पोलिसांनी पोलीस असल्याची ओेळख दिली नाही, शिवाय त्यांच्या अंगावर खाकी वर्दी नव्हती. त्यामुळेच हा प्रकार घडला. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कारवाईसाठी आलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल न करता ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे गणेश गायकवाड यास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, गायवाड व त्यांच्या पत्नीविरूद्ध तसेच अनेक ग्रामस्थांविरूद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी शेकडो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. येथे आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, रिपाइं ‘ए’ चे दिवाकर माने आदींनी भेट दिली. दोषी अधिकारी व हल्लेखोराविरूद्ध कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा आता ग्रामस्थांनी घेतला आहे.
म्हाळशी-शेगाव खोडके ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:18 PM