हिंगोली : येथील मोंढ्यात मागील आठवड्यापासून सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी आणत असल्याने सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटलची आवक होत आहे. परंतु, सोमवारपासून पावसाने रिपरिप सुरू केल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठीही अडथळा निर्माण होत असून, मंगळवारी केवळ एक हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.
शेतकऱ्यांकडे एक ते दीड महिन्यांपासून नवे सोयाबीन उपलब्ध झाले आहे तसेच गेल्यावर्षीचे सोयाबीनही भाववाढीच्या प्रतीक्षेत काही शेतकऱ्यांनी विक्रीविना ठेवले आहे. मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशेंनी वाढ झाली असून, ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रूपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. भाववाढीमुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आणखी भाववाढीची अपेक्षा आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आहे ते आता सोयाबीन विक्री करीत आहेत. परिणामी, मोंढ्यात आठवड्यापासून आवक वाढली आहे. सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. मात्र, सोमवारपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, शेतकऱ्यांनाही शेतमाल विक्रीसाठी बाहेर काढता येत नसल्याचे चित्र आहे. पावसात शेतमाल भिजण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा...येथील बाजार समितीच्या मोंढ्यात २८ नोव्हेंबर रोजी एक हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. आवक कमी झाल्यामुळे सोयाबीन टाकण्यासाठी टिनशेडमध्ये जागा मिळाली. या सोयाबीनला ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रूपयांदरम्यान भाव मिळाला, तर सरासरी ४ हजार ८२० रुपये भाव राहिला. सध्या सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला असला तरी शेतकऱ्यांना आणखी भाववाढीची प्रतीक्षा आहे.
गव्हापेक्षा ज्वारी खातेय भाव...येथील मोंढ्यात गव्हापेक्षा ज्वारी भाव खात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी ६१ क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १ हजार ८०० ते ३ हजार २५० रुपयांदरम्यान गव्हाला भाव मिळाला, तर ज्वारीची आवक १४ क्विंटल झाली होती. १ हजार ५०० ते ३ हजार ४५० एवढा भाव मिळाला. ज्वारीची आवक कमी होत असल्यामुळे भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.