शिरड शहापूर : औंढा - वसमत रस्त्यावरील वाई शिवारातील रितेश पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून ७५५३ रुपयांची रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. या भागात नियमित लुटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाई शिवारातील रितेश पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री अशोक राठोड हे कर्मचारी कामावर होते. पहाटे २ वाजेच्या सुमारास एका मोटर सायकलवर तोंडाला मास्क बांधलेले चोरटे आले. त्यांनी पंपावरील कर्मचारी राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम देण्यास सांगितले. यावेळी राठोड यांच्याकडे असलेली रोख ७५५३ रुपयांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले. कर्मचारी राठोड यांनी यानंतर पेट्रोल पंप व्यवस्थापकास संपर्ककरून याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या भागात नियमित होते लुटमारयापूर्वीही शिरड शहापूर येथे एका व्यापाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. परंतु, अद्याप आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. औंढा - वसमत राज्य रस्त्यावरील या भागात नेहमीच लुटमारीच्या घटना घडतात. या प्रकरणाकडे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.