वसमत (जि. हिंगोली) : सोयाबीनचे बोगस बियाणे विकून १२ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर येथील बियाणे कंपनी चालकाविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोविंद दहीवडे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली. तक्रारी देणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी करून वापरल्याची तक्रार होती़ वाढत्या तक्रारी पाहता कृती विभागाच्या वतीने बाजारातील कृषी केंद्रावरून सदर बियाणांचे नमुने घेतले व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले़ प्रयोगशाळेने उगवणक्षमता कमी असल्याचा अहवाल दिला़ त्यामुळे सदोष व उगवणक्षमता नसलेले बियाणे विक्री व वितरण करणाऱ्या मे. एशियन सीड्स प्रा़ लि़ कंपनी इंदोरचे संचालक आऱ एम़ पाटीदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़
तक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहनहजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका बसल्याची शक्यता आहे़ त्यामुळे बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सपोनि. तपासिक अंमलदार पी.सी. बोधनापोड यांनी केले आहे़
जिल्ह्यात सातवा गुन्हायापूर्वी जिल्ह्यात सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. वसमत येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर एकूण तक्रारींची संख्या सात झाली आहे. अजूनही काही कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. मात्र, त्यात इतर प्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने वेळ जात आहे. मात्र, काही ठिकाणी कृषी विभाग वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.