औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दसरा महोत्सवानिमित्ताने पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी मिरवणुकीस परवानगी दिली नव्हती. मात्र ही परवानगी झुगारून शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पालखी मिरवणूक काढली. यामुळे त्यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर आहे. यामुळे अनेक बंधानांसह व्यवहार सुरु आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे पारंपारिक पालखी मिरवणूक सोहळा होतो. यावर्षी हा सोहळ्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परवानगी देण्यात आली नाही. ही परंपरा खंडीत व्होऊ नये यासाठी अटीसह परवानगी देण्यात यावी अशी मागणी अनेक भाविकांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडे केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे परवानगीस नकार दिला.
यामुळे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी परवानगी नसतानाही पालखी मिरवणूक काढली. यात सहभागी पन्नास जणांसह आ. बांगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आ. बांगर हे नागनाथ संस्थान सल्लागार समितीचे सदस्य आहेत. याप्रकरणी तलाठी विजय सोमटकर यांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे.