हिंगोली : उबाठा गटाचे नेते डॉ.जयप्रकाश मुंदडा हे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने शुक्रवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.यामुळे शिंदे सेनेला बळ मिळाले असले तरीही मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा आमदार असताना त्यांचे भवितव्य काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वसमत तालुक्यात विधानसभेपूर्वी राजकीय हालचालींना गती आली आहे.यंदा लोकसभेची उमेदवारी वसमतच्या दोन माजी मंत्र्यापैकी एकाला मिळेल, आशी आशा व्यक्त केली जात होती. उद्धवसेनेचे नेते माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांनीही पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी अग्रह धरला होता. परंतु त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखविला नाही.त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच आपण उद्धवसेनेच्या गटाला जय महाराष्ट्र करणार आसल्याचे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची चलती असताना त्यांनी हा निर्णय घेतल्याने याबद्दल राजकीय मंडळी बुचकळ्यात पडली आहे.
मुंदडा यांनी शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, तालुका प्रमुख राजू चापके आदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. डॉ मुंदडा हे वसमत विधानसभेत चार वेळेस विजयी झाले होते. युतीच्या काळात ते सहकार मंत्री होत.तालुक्यात सध्या शिंदे सेनेचे नेतृत्व राजू चापके ही करीत आहेत. त्यांनी शिंदे सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला. मुंदडा यांच्या प्रवेशाने बाजू आणखी भक्कम झाली आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या भूमिकेवरच येथील जागेचा निर्णय काय होणार? हे अवलंबून आहे.
वसमतचे राजकीय गणिते बदलणार...
कृऊबा बाजार समीतीवर उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची सता आहे, डॉ मुंदडा यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आसल्याने वसमत बाजार समितीत फेरबदल होणार का आशी चर्चा झडत आहे. डॉ.मुंदडा यांचे चार संचालक बाजार समितीत आहेत. त्या संचालकांनी अद्याप उद्धवसेना सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे कळते. भविष्यात काय होणार? हे सांगणे सध्यातरी कठीणच आहे.
शिंदेसेनेला आणखी बळकटी मिळणार?
माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या शिवसेना प्रवेशाने मतदार संघात शिवसेना वाढणार असल्याचे चित्र आहे. मुंदडा यांना मानणारे अनेक कार्यकर्ते अजूनही उद्धवसेनेत आहेत. आगामी काळात त्यांनीही बाजू बदलली तर वेगळे चित्र निर्माण होवू शकते. यामुळे आगामी विधानसभेला रस्सीखेच पहायला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.