लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले ग्रामसेवकांचे पुरस्कार व विविध प्रश्न प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी निकाली काढले आहेत. यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामसेवकांना २0१३-१४ ते १५-१६ या तीन वर्षांतील पुरस्कारासाठी मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये प्रत्येक गटातून एका ग्रामसेवकाची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांतील पंधरा ग्रामसेवक या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये २0१३-१४ या वर्षासाठी हिंगोली पं.स.तून राजू विश्वनाथ भगत, औंढा नागनाथ-दत्ता मारोती नागठाणे, वसमत-बालासाहेब नामदेव कदम, सेनगाव-लक्ष्मीकांत विश्वनाथ खोडके, कळमनुरी शिवाजी मेघाजी अन्नपूर्वे, २0१४-१५ या वर्षासाठी हिंगोलीतून भुजंग शेषराव सोनकांबळे, औंढा-भाऊसाहेब अर्जुनराव भुजबळ, वसमत- प्रसन्न लक्ष्मणराव जोशी, सेनगाव-मारोती त्र्यंबक कावरखे, कळमनुरी- दिलीप देवीदास वाकडे, २0१५-१६ या वर्षासाठी हिंगोलीतून भारत नारायण कोकरे, औंढा-रामप्रसाद सोपानराव काळे, वसमत- ज्ञानेश्वर नारायण गुडेवार, सेनगाव - अनिल लक्ष्मण ससाणे, कळमनुरी- प्रवीण रामकृष्ण तवर यांचा समावेश आहे.याशिवाय १२ वर्षांनंतर देण्यात येणारा अश्वासित प्रगती योजनेतील कालबद्ध पदोन्नतीच्या वेतनश्रेणीही गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याची बोंब ग्रामसेवकांमधून होत होती. यासाठी ग्रामसेवकांनी अनेकदा निवेदने दिली. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी ही मागणी आग्रहाने रेटली जात होती. मात्र प्रशासनाने आतापर्यंत ही मागणी पूर्ण केली नव्हती. त्यामुळे पंचायत विभागावर कायम रोष असायचा. आता ही मागणीही पूर्ण झाली आहे. तब्बल ६८ जणांना या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला आहे.यामध्ये ५२00-२0२00 व ग्रेड पे २८00 तर १ आॅक्टोबर २0१८ पासून ३५00 ग्रेडपेबाबत आदेश काढण्यात आले आहेत. तर कालबद्ध पदोन्नती दिल्याने नियमित पदोन्नतीत हीच वेतनश्रेणी कायम राहील. नवीन देय राहणार नसल्याचेही म्हटले आहे. यामध्ये २0१२ ते २0१७ या कालावधीतील अनेकांचा समावेश असून त्या-त्या तारखेपासून त्यांना १२ वर्षांनंतरची वेतनश्रेणीचा लाभ मंजूर झालेला आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून वंचित असलेल्यांना त्याचा आता लाभ झाला आहे.ग्रामसेवकांच्या काही मागण्या मंजूर झाल्या असून काही मागण्या अजूनही पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे, शैनुद्दीन आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामसेवकांनी इतरही काही मागण्या पूर्ण करणे शक्य असून त्याकडेही देशमुख यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी या मागण्याही लवकरच पूर्ण होतील, असे सांगितले.
...अखेर ग्रामसेवकांचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:18 AM