लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील महिनाभरापासून चर्चेत असलेला विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्याचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. या २४0 शिक्षकांसह ८७ आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विस्थापितांच्या बदल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत होता. विविध शिक्षक संघटनांनी यावरून रणकंदन केले होते. यात काल व आज मिळून एकूण ३२७ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यात ७६, सेनगावात २३, वसमतला ११५, कळमनुरीत ८0 तर औंढ्यात ३३ जणांना नियुक्ती मिळाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जुनी शाळा न सोडता नव्या शाळेची प्रतीक्षा करणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. यावेळी रॅण्डम राऊंड असल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला होता. आता कसे ठिकाण मिळेल, याची काही शाश्वती नव्हती. मात्र यातही बोटावर मोजण्याइतके पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे शहराजवळची शाळा मिळाल्याने खुश झाले आहेत. तर काहींना मात्र दूरवर फेकल्याने या प्रक्रियेचा राग येत आहे. मागच्या वेळी किरकोळ ठिकाणी रोष होता. मात्र यावेळी थोडा अधिक प्रमणात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिक्षिकांतून मोठी ओरड आहे.पती-पत्नी एकत्रीकरणाला कोलदांडाकळमनुरी : विस्थापितांच्या रॅण्डम राउंडमधील बदल्यांत पती-पत्नी एकत्रिकरणाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे. शासन निर्णयानुसार पती- पत्नी सेवेत असतील तर त्यांना ३० कि.मी.च्या आतील शाळेत पदस्थापना देणे बंधनकारक होते. परंतु रॅन्डम राऊंड बदली झालेल्या पती, पत्नीला ३० कि.मी.पेक्षा जास्त लांबच्या शाळेत पदस्थापना दिली आहे. या पदस्थापनेमुळे सर्व कुटूंबांचीच ताटातूट झाली असून आता राहण्याचे ठिकाण कोणते ठेवायचे? असा प्रश्न पती-पत्नी शिक्षकांना पडला आहे. बदलीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना पती-पत्नी सेवेत आहेत काय? दोघांच्या शाळेमधील अंतर या सर्व बाबी बदली अर्जात भरुन घेतल्या होत्या. तरीही शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे पती-पत्नी सेवेत असलेल्या शिक्षकांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता दाद कोणाकडे मागणी दाद मागूनही न्याय मिळेल का? असा प्रश्न बदली झालेल्या जोडप्यांना पडला आहे. पती कळमनुरी तालुक्यात तर पत्नी सेनगाव, हिंगोली, औंढा, वसमत तालुक्यात पदस्थापना देण्यात आली आहे. कार्यमुक्ती व पदस्थापनेचे आदेश शिक्षकांना वितरीत करण्यात आले आहेत. बदलीने नियुक्ती दिलेल्या शाळेवर कालावधीत हजर न झाल्यास शिक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाहीही करण्यात येणार आहे. शासन निर्णय ग्रामविकास विभाग २७ फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयानुसार विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे.
अखेर २४0 विस्थापितांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:26 AM