- गजाजन वाखरकरऔंढा नागनाथ (हिंगोली ): नांदेड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीशकालीन पूल अखेर आज दुपारी कोसळला. आज पहाटेपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु असून ओढ्याला आलेल्या पुरामुळे पुलाचा आधार असलेला खालील भाग निखळला होता. तसेच रस्त्यावर तडे गेले होते. यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे काही दुर्घटना घडली नाही.
औंढा नागनाथ तालुक्यात आज पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील येळेगाव सोळंके, जवळा बाजार , शीरड शहापूर, पिंपळदरी, पोटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले, ओढे तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीश कालीन पुलाचा खालील भाग पुराच्या पाण्यामुळे निखळला. तसेच वरील महामार्गावर भेगा पडल्या होत्या. यामुळे या मार्गावरील वाहतून बंद करण्यात आली होती. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी यासाठी धाव घेतली. वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अखेर पूल कोसळला, पर्यायी मार्ग वापराचौंडी शहापूर येथील ओढ्यावर असलेला हा पूल ब्रिटीश कालीन होता. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाच्या डागडुजीचा प्रश्न प्रलंबित होता. नांदेड आणि औरंगाबादला जोडणाऱ्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. यामुळे आज पहाटे रस्त्याला तडे गेल्यानंतर वाहतूक बंद होताच दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी कमकुवत झालेला पूल कोसळला. ओढा मोठा असून सातत्याने पाऊस सुरु असल्याने नवीन पूल उभारण्यास मोठा कालावधी लागणार आहे. यामुळे आता प्रवास्यांनी नागेशवाडी फाट्यावरून औंढा- जवळा बाजार- हट्टा- वसमत ते नांदेड या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.