हिंगोली : जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना शासनाने लॅपटॉप व प्रिंटरचा पुरवठा करण्यास सांगितल्याने तलाठी संघटना यासाठी आक्रमक होत आहेत; मात्र पुरवठाच होत नसल्याने येत असलेली अडचण अखेर दूर झाली. ११२ लॅपटॉप व ३७ प्रिंटर मिळाले असून, लवकरच वितरण होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात ३० मंडळ अधिकारी व १७४ तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर मिळणे बाकी होते. त्यातच नवीन भरतीतील २१ तलाठी व ५ मंडळ अधिकाऱ्यांचा प्रस्तावच गेला नव्हता. मागील वर्षभरात तीनदा निविदा काढल्यानंतरही पुरवठादारच मिळत नव्हता. लॅपटॉपसाठी ३५ हजार तर प्रिंटरसाठी १० हजार रुपये या प्रमाणात खर्चाची मुभा आहे; मात्र पुरवठादारच मिळत नसल्याने यासाठी तरतूद असूनही फायदा होत नव्हता.
काही दिवसांपूर्वी एका पुरवठादाराने होकार दिल्यानंतर आता ११२ लॅपटॉप व ३७ प्रिंटर मिळाले आहेत. यावर जवळपास ७० लाखांचा खर्च झाला. त्याचे वाटप करणे बाकी आहे. तर आणखी ८६ लॅपटॉप व २६ प्रिंटर मिळणे बाकी आहे. यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यंदा तो मंजूर झाला तर उर्वरित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनाही लॅपटॉप व प्रिंटर मिळणार आहेत.
सातबाराची जमा रक्कम जाते कुठे?
सात-बारा व इतर दस्तावेजांसाठीची तलाठ्यांकडे जमा होणारी रक्कम या दैनंदिन खर्चासह साहित्यासाठी खर्च करण्याची मुभा असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगितले जाते. अनेक तलाठी आम्ही घरचे साहित्य वापरत असल्याचे सांगत फिरतात. मग त्यांच्याकडे लाखोंच्या घरात जमा होणारी ही रक्कम जाते तरी कुठे? हा प्रश्नच आहे. प्रशासनही याबाबत कधी विचारणा करते की नाही? हा प्रश्नच आहे. ऑनलाइन सात-बारा सुरू झाल्यापासून अर्थात २०१८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १.४५ कोटी जमा झाले आहेत. १७४ सज्जे आहेत. काही सज्जांना खरेदीइतकी रक्कम मिळत नसेल मात्र इतर सज्जे तर यासाठी सक्षम आहेत.
सात-बारा ऑनलाइनचे २ टक्के काम बाकीच
सात-बारा ऑनलाइनचे २ टक्के काम दोन वर्षांपासून बाकी आहे. या सात-बारांचे रेकॉर्ड किचकट असल्याने तलाठी मंडळी मग कधी साहित्य नसल्याचे सांगतात. तर कधी साहित्य नादुरुस्त असल्याचे सांगतात; मात्र आता साहित्य मिळाले ते तरी सात-बारांतील त्रुटी करून १०० टक्के अद्ययावत करणार का? हा प्रश्न आहे. १.८८ लाखपैकी चार ते पाच हजार सात-बारा अजूनही अद्ययावत नाहीत. हे काम मागे राहण्यातही पुढारकी करणाऱ्या तलाठ्यांचीच संख्या जास्त आहे. शिवाय अनेकांना तर आता हे लॅपटॉप चालवता येतील की आणखी एक सहायक वाढवावा लागेल? हा आणखी एक प्रश्न आहे.