रिॲलिटी चेक
अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५
हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री बारा वाजल्यानंतरही अलर्ट असते. रात्रपाळीला चालकासह दोन फायरमन कर्तव्यावर होते. यापैकी एक चालक, एक फायरमन जागा, तर एक झोपेत असल्याचे दिसले.
शहरातील अग्निशमन कार्यालयाला स्वत:चे कर्मचारी नाहीत. स्वच्छता विभागाचे कर्मचारीच काही वर्षापासून अग्निशमन कार्यालयाचा कारभार पाहतात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस झोप लागणे साहजिक आहे. परंतु, आमच्यासाठी झोप ‘वैरी’ आहे म्हणून तर आम्ही डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किट म्हणा, अचानक आग लागणे म्हणा, अशा घटना सांगून येत नसतात. कोणत्याही वेळी कॉल आला की, आम्हाला लगेच जावे लागते, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाकडे १८ कर्मचारी असून, यामध्ये चालक ५, तर १३ फायरमनचा समावेश आहे. आमच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ - आठ तास ड्युटी करतो, असे उपस्थित चालकाने सांगितले.
तयार स्थितीत दोन बंब...
घटना कधी सांगून येत नाही. त्यामुळे अग्निशमनचे दोन्हीही बंब तयार ठेवावे लागतात. कोणत्याही वेळी नागरिकाचा फोन येऊ शकतो. त्यासाठी अलर्ट राहावे लागते. घटनास्थळी कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्व तयारीने आम्ही मुख्यालयी जागेच असतो. अग्निशमन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारही उघडेच असते. प्रमुखाचा फोन आला की, आम्ही घटनास्थळी रवाना होतो.
दोन कर्मचारी जागे...
शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवरील अग्निमशन कार्यालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. यापैकी एक चालक, दोन फायरमन असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची ड्युटी वाटून दिलेली आहे. सोमवारी रात्री १२.२५ वाजण्याच्या दरम्यान एक चालक, एक फायरमन जागेच होते. दुसरा फायरमन मात्र झोपी गेलेला दिसून आला.
आळसपणा भोवतो...
आम्ही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असलो तरी कामाच्या बाबतीत आळसपणा मात्र अजिबात करीत नाहीत. जेवढे काम स्वच्छता विभागाचे करतो. त्यापेक्षा जास्तीची सेवा अग्निशमन विभाग करतो. आळसपणा काही कामाचा नसतो म्हणून नेहमी सतर्क राहतो.
- नियम काय सांगतो?
ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने झोपी जाता कामा नये. कोणत्याही वेळी नागरिकांचा फोन येऊ शकतो. त्यामुळे फोनकडे लक्ष देत अलर्ट राहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कार्यालयात ठेवलेले वाहन चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करणे चालकाचे, तर यंत्र बरोबर आहेत, हे पाहणे फायरमनचे काम आहे.
प्रतिक्रिया...
एका गाडीची आवश्यकता
हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाड्या (बंब) अपुऱ्या पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सतर्क राहण्याच्या सूचना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.
- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली