हिंगोली : १ ऑगस्ट रोजी जि.प.च्या आवारात भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात चव्हाण यांनी शिंदे गटाच्या आमदारासह अन्य दोघांवर आरोप केले. मात्र चव्हाण यांनी तीनदा जबाब बदलल्याने आम्ही आमच्या तपासाच्या आधारावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले.
चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी पथकाला बुलेटसह एक मोबाईल आढळून आला होता. माबाईलची तपासणी केली असता हा मोबाईल अक्षय इंदोरिया याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील रेकॉर्डिंगची तपासणी केली असता यात अक्षय इंदोरिया, सत्यम देशमूख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एका अल्पवयीन मुलाचे संभाषण मिळाले. पप्पू चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी कट रचून पिस्तूलने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे यात निष्पन्न झाले. पप्पू चव्हाण यांनीसुद्धा त्यांच्यासोबत वाद झाल्याचे तोंडी सांगितले. तसेच हल्ला झाला तेव्हा पप्पू चव्हाण यांना अक्षय इंदोरिया ओळखू आला. पप्पू चव्हाण समर्थक कार्यकर्त्याच्या मुलीसोबत प्रेम संबधातून दोन महिन्यांपूर्वी पप्पू चव्हाण व मुलीकडील लोकांनी अक्षय इंदोरिया व ओम पवार यांना मारहाण केली हेाती. त्यामुळे मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. तेव्हा या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आता बदला घेण्यासाठी आरोपीने गोळीबार केला.
तिघांना घेतले ताब्यात; दोघे फरारदरम्यान, गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवित अवघ्या काही तासात यातील तीन आरोपींना पकडले. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. यात गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, दोन जिवंत राऊड व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. यातील मुख्य आरोपी व त्याच्याकडील पिस्तूल अजून जप्त करणे बाकी आहे.
एक आरोपी पप्पू चव्हाण यांचा भाचापोलिसांनी अटक केलेला एक आरोपी ओम पवार हा नात्याने पप्पू चव्हाण यांचा भाचा आहे. तसेच पप्पू चव्हाण यांच्यावरसुद्धा १९ गुन्हे दाखल असून ते मोक्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आमदारावरील आरोपांबाबत तपास करूदरम्यान, नांदेड येथे उपचार घेत असलेले पप्पू चव्हाण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारासह आमदार समर्थकांची नावे घेतली असून त्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सीआडीमार्फत तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या संदर्भात विचारले असता पोलिस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले, पप्पू चव्हाण यांनी तीनदा जबाब दिला. त्यात तफावत आढळली. शेवटी आम्ही तपास करून गुन्हा दाखल केला. या व्हिडीओप्रमाणेही तपास करू. काही आढळल्यास त्याप्रमाणे कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.