हिंगोली : विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यांसह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, योग्य समुपदेशन केल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समुपदेशन केल्याने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.
संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारीरिक व मानसिक त्रास आदी कारणांमुळे कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. हे वाद विकोपाला पोहोचत असल्याने अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. मात्र, याचे परिणाम जोडप्यांसह लहान मुलांनाही भोगावे लागतात. रागाच्या भरात अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न येथील भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या काळात ३५९ प्रकरणे भरोसा सेलकडे आली होती. योग्य समुपदेशनामुळे १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.
जिल्ह्यात येथे आहे भरोसा सेल
येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेल कक्ष उभारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे प्रमुख म्हणून काम पाहतात. तसेच पोहेकॉ शेख इस्माईल, मपोहे सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोलारे, वर्षा शिंदे आदी कर्मचारी वर्ग नियुक्त केला आहे. तर सोनल सुलभेवार, संतोष दहातोंडे, स्वेता लाटे आदी समुपदेशक म्हणून उपलब्ध करून दिले आहेत. कायदेशीर मदत, संरक्षण अधिकारी, बाल समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सेवाही पुरविली जाते.
बायको माहेरी जाते म्हणून...
येथील भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीत पत्नी माहेरी जाते, सारखं मोबाईलवर बोलते, उद्धट बोलते आदी कारणे नमूद आहेत. यातून कौटुंबिक वाद निर्माण होऊन अशी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत जातात.
संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. परंतु, जोडप्यांना योग्य समुपदेशन केल्यास त्यांच्यातील गैरसमज दूर होतात. मागील आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.
- विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल प्रमुख, हिंगोली
आठ महिन्यांत भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे - ३५९
प्रकरणात घडवून आणला समेट - १२६