कनेरगावनाका ( हिंगोली ): तालुक्यातील कनेरगाव नाका येथील संगमेश्वर संस्थानात भागवत सप्ताहानिमित्त यात्रा भरलेली आहे. यात्रेत खेळण्यासाठी ठेवलेल्या मिकी माउसच्या आकाराचा फुगा मुलांसह अचानक हवेत उडाला. यावेळी १०० फुट उंचावरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला तर चार जखमी झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेदरम्यान घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कनेरगाव नाका येथील कर्ममेळा वसतिगृहातील तीन विद्यार्थी दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यावर येथील पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या संगमेश्वर संस्थानात सप्ताहाच्या सांगते निमित्त महाप्रसाद घेण्यासाठी गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर ते यात्रेतील मिकी माउसच्या आकाराचा फुग्यावर जम्पिंगच्या खेळण्यावर खेळत होते. अचानक सुसाट्याचा वारा सुटल्याने ते खेळणे वाऱ्यासोबत शंभर फुट उंच उडाले. यावेळी त्यातून खाली पडल्याने मनोहर राघोजी मोरे (१०) हा जागीच ठार झाला. तर प्रवीण राघोजी मोरे (१२), शिवाजी देवीदास जहरव (११) तीघेही रा. बाभुळगाव ता. सेनगाव, करण रमेश धुळे (१३) रा. शेंबाळपिंपरी ता. उमरखेड ( तिघांचा हल्ली मुक्काम कर्ममेळा वसतिगृह कनेरगाव नाका) व डिगांबर माधव बर्वे (६) रा. मोप ता. हिंगोली हे चौघे जखमी झाले.
जखमींना वाशिम येथील खाजगी रुणालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर मयत बालकाला फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी कनेरगाव पोलीस चौकीचे जमादार साहेबराव राठोड कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.