पाथरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये बँक प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी १० लाख रुपयांच्या कर्जावर व्याजमाफीची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे.आॅनलाईन पद्धतीने महामंडळाकडे नोंदणी केल्यानंतर एलओआय प्रमाणपत्र उपलब्ध होते. हे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेकडे दाखल करण्यात येते आहे. विशेष म्हणजे, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा महिनाभरापूर्वी जिल्हा दौरा झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून सुशिक्षित बेरोजगारांनी महांमडळाकडे नोंदणी केली आहे. पाथरी शहरात चार राष्टÑीयकृत बँका आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ ग्रामीण बँक व बँक आॅफ महाराष्टÑ बँकेचा समावेश आहे.या बँक शाखेकडे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसायासाठी ५०० प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही प्रकरणाचा बँकेकडून निपटारा करण्यात आला नाही. बँकेकडून प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे बेरोजगार युवक बँकेत खेटे मारीत आहेत.उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज देण्यास बँका ठोस निर्णय घेत नसल्याने सकल मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांची भेट घेऊन याबाबत गा-हाणे मांडले.या युवकांच्या मागणीवरून उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांनी शहरातील चारही राष्टÑीयकृत बँकांना लेखी पत्र काढून महामंडळांतर्गत प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे.मोफत प्रमाणपत्रांचे वाटपअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांकडून बेरोजगार युवकांना कर्जाचे व्याज माफ करण्याची योजना असल्याने पाथरी येथील मावळा संघटनेच्या वतीने महामंडळाचे जवळपास ५०० नोंदणीचे एलओआय प्रमाणपत्र मोफत काढून दिले आले आहेत.
मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडे नोंदणी करून कर्ज प्रकरणे बँकांकडे दाखल होत आहेत. मात्र बँका लाभार्थ्यांची अडवणूक करीत आहेत. यामुळे उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर आता बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.-अमोल भाले, विभागीय अध्यक्ष, मावळा संघटना