हिंगोली/कळमनुरी : समृद्धी महामार्गासह राज्यात मेट्रोचे नवनवे महामार्ग तयार केले जात असतानाच कळमनुरीजवळच्या करवाडी गावाला अजूनही रस्ता झालेला नाही. त्याचा फटका मंगळवारी एका गर्भवतीला बसला. प्रसुतीसाठी तिला भरपावसात बाजेवर झोपवून पाच किलोमीटरवर नांदापूरला न्यावे लागले.
करवाडी येथे माहेरी आलेल्या सुवर्णा रमेश ढाकरे यांना प्रसूतकळा सुरू झाल्या. ग्रामस्थांनी त्यांना बाजेवर झोपविले. पावसामुळे त्यांच्या अंगावर ताडपत्री टाकली व इतरांनी छत्र्या घेऊन चिखल तुडवत नांदापूरपर्यंत आणले. सकाळी अकरा वाजता निघालेले ग्रामस्थ दीड तासानंतर नांदापूरला पोहोचले. नांदापूरवरुन १०८ रूग्णवाहिकेने या महिलेला हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. रात्री आठ वाजेपर्यंत महिलेची प्रसूती झाली नव्हती.मतदानापुरती गावाची किंमत५०० लोकसंख्येचे करवाडी हे गाव १०० टक्के आदिवासीबहुल गाव आहे. जवळपास सर्वच कुटुंबे मोलमजुरी करतात. मतदानापुरतेच या गावाकडे पाहिले जाते. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ४० कि.मी. पायी चालून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. उच्च न्यायालयानेही त्याची दखल घेतली होती; परंतु अद्याप रस्ता झाला नाही.