- राजकुमार देशमुखसेनगाव (जि. हिंगोली) : शहरात बुधवारी मध्यरात्रीच्यावेळेला चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला. यानंतर मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने फोडली. परंतु चोरट्यांच्या हाती फारसा काही मुद्देमाल लागला नाही. परंतु हे चोरटे चोरी करताना ‘सीसीटीव्ही’ मध्ये जेरबंद झाले आहेत. यातील एक चोरटा हा सुशिक्षित असल्याचे त्याच्या एकूण वर्णनावरून स्पष्ट होत आहे. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
सेनगाव शहरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था ढेपाळली गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच शहरात हुल्लडबाज तरुणांनी उच्छाद मांडला असताना आता चोरटेही शहरात सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्यावेळी चोरट्यांनी शहरातील योगेश मेडिकलसह मुख्य रस्त्यावरील अन्य चार दुकानांचे शटरचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. टी पॉईंटसह मुख्य रस्त्यावरील चार दुकानांवर चोरी करुन चोरट्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. योगेश मेडिकल येथे झालेल्या चोरीत चोरट्यांच्या हाती जवळपास नऊ हजार रुपये रोख रक्कम लागली. या चोरीच्या दरम्यान मेडिकलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यामध्ये चोरटा स्पष्टपणे दिसत आहे. सुशिक्षित, ‘साहेबांच्या’ रुबाबात आलेल्या चोरट्याने सेनगाव पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
सूटबुटातील चोर सापडेल का पोलिसांना?अंगावर चांगले कपडे, इन केलेल्या अवस्थेत, पायात बूट, एका हातात डिजिटल घड्याळ, दुसऱ्या हातात केसरी रंगाचा धागा व तोंडाला कुठलाही मास्क न वापरता चोरी करणे म्हणजे हे एकप्रकारे सेनगाव पोलिसांना आव्हानच म्हणावे लागेल.