आखाडा बाळापूर (हिंगोली ) : कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले. मात्र, प्रसंगावधान राखून कवडी येथील ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला.
हदगाव तालुक्यातील नेवरी गावातील विलास इंगळे, बालाजी शिंदे ,संतोष सुर्यवंशी ,किशोर खिल्लारे ,श्रीकांत वानखेडे, उत्तमराव खिल्लारे, रामदास शिंदे, अाबाराव काळे हे आज सकाळी पूर पाहण्यासाठी कयाधू नदी काठावर खास रिक्षा करून आले. शेवाळा जवळ रिक्षा थांबवून ते जवळच्या पुलावर गेले. मात्र येथे उभे असताना अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली. बघता बघता पाणी कंबरेपर्यंत आले. यामुळे या आठही जण घाबरली, मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा सुरु केला. परंतु, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शेवाळा गावच्या बाजूने त्यांना वाचवण्यासाठी कोणीही जाऊ शकले नाही. तर दुसऱ्या बाजूस कोणीच उपस्थित नव्हते.
दरम्यान, बाळापुर पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कवडी गावचे उपसरपंच दयानंद पतंगे यांना फोन करून ही माहिती दिली. माहिती मिळताच उपसरपंच पतंगे यांनी संदीप गावंडे व राजू पतंगे यांच्यासह शेवाळा पुलाकडे धाव घेतली. येथे हातांची साखळी करत त्यांनी आठही जणांना प्रयत्नपूर्वक सुखरूप बाहेर काढले. यानंतर आठही जण नेवरी गावास परतले.